शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा व संस्कृतीच्या संवर्धनाला बळ देणारा अर्थसंकल्प : आ. अमोल जावळे
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क| महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक, विकासाभिमुख आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारा असल्याची प्रतिक्रिया शेतकरी, युवाशक्ती आणि महिला सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करणारे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा या सर्व क्षेत्रांचा समतोल विचार करून सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या धोरणाचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही आ.अमोलभाऊ जावळे यांनी म्हटले आहे.
आ.अमोलभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की, राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देणाऱ्या कर्जमाफीसारख्या निर्णयांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शेती हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारा हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून लाखो शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्याची संधी मिळेल.
याशिवाय उद्योग क्षेत्राला चालना देणाऱ्या तरतुदी, रोजगारनिर्मितीला गती देणारे उपक्रम, पायाभूत सुविधा बळकट करणारे प्रकल्प, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक तसेच पर्यावरण संवर्धनासंबंधीचे निर्णय यामुळे महाराष्ट्राचा विकास अधिक व्यापक आणि शाश्वत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच वनहक्क कायद्यांतर्गत आदिवासी बांधवांना मिळालेल्या जमिनींना ‘Farmer ID’ देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होईल, असेही आ. जावळे यांनी सांगितले. ग्रामीण व शहरी भागातील संतुलित विकासाचा विचार या अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले.
आ. अमोल जावळे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प म्हणजे विकास, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा सुंदर संगम आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, उद्योगपती आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा देणारा ठरेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

