राहिलेल्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : लाडकी बहीण योजनेला पुन्हा मुदतवाढ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील महिलां साठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची सप्टेंबर अखेरपर्यंत मुदत होती. ती आता १५ ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी दिलेली ही तिसरी मुदतवाढ आहे.
राज्यातील ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पुढील चार दिवसांत अर्ज करून या योजनेचा लाभ महिलांना घेता येईल. मात्र १५ ऑक्टोबरपर्यंत भरावयाचे अर्ज हे केवळ अंगणवाडी सेविकांमार्फतच भरावे लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या मुदतवाढीबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाली आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यात आतापर्यंत २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात ५ महिन्यांचे हप्ते सरकारकडून जमा करण्यात आले आहेत.