भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर शहरात बुलेटस्वारांचा ‘तांडव’; बस स्टँड ते छत्री चौक बनले ‘डेथ ट्रॅप’

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेल्या फैजपूर शहरात सध्या कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. शहराच्या मुख्य हृदयस्थानी असलेल्या बस स्टँड, सुभाष चौक आणि छत्री चौक परिसरात काही विकृत मानसिकतेच्या बुलेटस्वारांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, त्यांच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे आणि जीवघेण्या स्टंटबाजीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर: टवाळखोरीचा कळस
बाहेरगावावरून शिक्षणासाठी फैजपूरमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनींना बस स्टँडवर उतरल्यापासून छत्री चौकापर्यंत जाताना अग्निदिव्यातून जावे लागत आहे. काही टवाळखोर मुले कॉलेज सुटण्याच्या वेळी मुद्दाम विद्यार्थिनींच्या घोळक्याजवळून बुलेट अतिवेगाने नेतात. एवढेच नाही तर, मुलींना पाहून बुलेटच्या सायलेन्सरमधून ‘फटाक्यांचे’ आवाज काढणे, आरडाओरड करणे आणि कट मारणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या छेडछाडीमुळे विद्यार्थिनींमध्ये दहशतीचे वातावरण असून, पालकांनी आता आपल्या पाल्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

वृद्धांच्या आरोग्याशी खेळ: शांतता क्षेत्राचा भंग
या कर्णकर्कश आवाजाचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे. सुभाष चौक आणि रहिवासी भागातील वृद्धांना या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची भीती निर्माण झाली आहे. अचानक होणाऱ्या ‘फटाक्यांसारख्या’ आवाजामुळे रस्त्यावरून चालणारे वृद्ध दचकून खाली पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. “आम्ही शांततेत जगू शकतो की नाही?” असा आर्त सवाल शहरातील ज्येष्ठ नागरिक विचारत आहेत. रुग्णालयांच्या परिसरातही या सायलेन्सरचा आवाज घुमत असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

‘मॉडिफाईड’ सायलेन्सरचा सर्रास वापर; आरटीओ आणि पोलीस गप्प का?
कंपनीचा सायलेन्सर काढून बेकायदेशीरपणे आवाज वाढवणारे सायलेन्सर बसवण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्ते सुरक्षा नियमांची उघडपणे पायमल्ली होत असतानाही पोलीस प्रशासन आणि आरटीओ विभाग याकडे डोळेझाक का करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बस स्टँड आणि चौकांमध्ये पोलिसांची उपस्थिती असतानाही हे बुलेटस्वार राजरोसपणे फिरतात, हे विशेष!

प्रशासनाला जाहीर इशारा!
जर येत्या काही दिवसांत या बुलेटस्वारांवर कठोर कारवाई झाली नाही, त्यांच्या गाड्या जप्त केल्या नाहीत आणि सायलेन्सरवर ‘रोलर’ फिरवला नाही, तर फैजपूरचे नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!