उमेदवार गोळीबार प्रकरण : निवडणुकीत सहानुभूती मिळावी म्हणून करवून घेतला गोळीबार, अपक्ष उमेदवारासह त्यांची मुले व शालकाचा सहभाग
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभा निवडणूकीत आपल्याला सहानुभूती मिळून विजय मिळावा याकरिता ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी घरावर गोळीबार करवून घेत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न एका अपक्ष उमेदवाराच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्याच्यासह त्याची २ मुले, शालक असे एकूण ५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी अनेक उमेदवार वेगवेगळे फंडे वापरतात. असाच एक विचित्र फंडा विधानसभा निवडणुकीत जळगाव मध्ये वापरला गेला. विधानसभा निवडणुकीत ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी दि. १९ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी जळगाव शहरातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख गुलाम हुसेन यांच्या शेरा चौकातील घरावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता. या वेळी बंदुकीतून तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. मात्र त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यात घराच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या, तसेच जिवंत काडतुसे देखील त्या ठिकाणी सापडले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन तो तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) कडे वर्ग करण्यात आला होता.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, बौद्धिक कौशल्य वापरून अखेर हा गुन्हा उघड करून फिर्यादी असलेला उमेदवार शेख अहमद हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
तपासात एलसीबीचे तपासाधिकारी तपासासाठी सिल्लोड, छत्र. संभाजीनगर, भिवंडी, इंदौर, मालेगाव, हैद्राबाद अशा विविध ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोधमोहीम राबविली. त्यातून जळगाव विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख गुलाम हुसेन यांचेसह त्यांचे मोठे चिरंजीव शेख शिबान अहमद (वय ३५, रा. जळगाव), इरफान अहमद मो. हुसेन (वय ३२, रा. मालेगाव जि. नाशिक) यांना अटक करण्यात आली. तपासात त्यांनी, निवडणुकीत सहानुभूती मिळविण्यासाठी गोळीबार करून घेण्याचे कृत्य केल्याची माहिती समोर आली.
तपासातून अशी माहिती मिळाली की, मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा याने गोळीबार केल्याचे समोर आले. तर त्याच्यासह उमेदवार शेख अहमद यांचा लहान मुलगा शेख उमर फारूक हुसेन हा देखील फरार आहे. त्यांचा शोध सुरु आहे. तर गुन्ह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. यातील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर तपासकामी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, हेकॉ विजयसिंग पाटील, अक्रम शेख, रवि नरवाडे,राजेश मेंढे,जितेद्र पाटील विजय पाटील, ईश्वर पाटील, हरिलाल पाटील यांनी केला आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा