ब्रेकिंग: विद्यार्थ्यांच्या परीक्षां घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय !
नवी दिल्ली। देशातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे ज्या निकालाकडे लागले आहेत, तो पदवी परीक्षांसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.
देशातील विद्यापीठांमधील अंतिम सत्र परीक्षांना विरोध करणाऱ्या याचिकांवर कोर्टाने आज अंतिम निर्णय दिला आहे. कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी राज्य सरकारची भूमिका होती. त्यासाठी युवासेनेकडून आदित्य ठाकरेंनी याचिकादेखील दाखल केली होती. मात्र राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल न्यायालयानं दिल्यानं महाराष्ट्र सरकार आणि युवा सेनेला मोठा झटका बसला आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्या लागतील. त्या टाळता येणार नाहीत, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे. विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा होणार हे यातुन स्पष्ट झाले आहे, ज्या राज्यांना वाटत आहे की त्यांना परीक्षा घेणे शक्य नाही, त्या राज्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे जावे. परंतु राज्य अंतिम सत्र परीक्षा घेतल्याशिवाय पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.