नाशिकमहाराष्ट्र

CRIME : बनावट जन्म दाखला प्रकरणी निलंबित तहसीलदारांवर गुन्हा

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्म दाखला तयार करून दिल्याप्रकरणी नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना सहआरोपी करण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशीना जन्मदाखल्याद्वारे भारतीय बनविण्याचा आरोप झाल्या नंतर या प्रकरणाच्या तपासासाठी एस आयटीची नियुक्ती करण्यात आली.

तहसीलदार विशाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव शहरात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिमांनी बनावट जन्मदाखले बनवल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यानंतर शासनाने एसआयटी स्थापन करत चौकशी सुरू केली आहे.

रहिवाशी दाखले नागरिकांना देताना पूर्ण खात्री आणि शहानिशा न करता मालेगावात जन्म दाखले देण्यात आले. या प्रकरणी मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन कुमार देवरे आणि नायब तहसीलदार संदीप धरणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तहसीलदार पदावर असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशांप्रमाणं केलं नाही. कामकाजात गांभीर्य दाखवले नाही, असा ठपका ठेऊन दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. नितीन कुमार देवरे हे जळगावच्या बोदवड इथं तहसीलदार पदावर कार्यरत होते. शासनाचे उपसचिव अजित देशमुख यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.

जन्म दाखले प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना सहआरोपी करण्यात आले असले तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. एसआयटीने त्यांना तात्काळ अटक करावी व उर्वरित अधिकार्‍यांवरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीचे मुस्तकिम डिग्निटी यांनी केली. तसेच मंगळवार दि.१८  रोजी याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या मोहंमद आझम, मोहंमद आसीफ निहाल अहमद व माजीद अहमद मोहंमद सिद्दीकी यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!