१०,२० व ५० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | केंदसरकारने एक महत्त्वाची सूचना जाहीर केली असून देशभरात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा कोणताही तुटवडा नसल्याचे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे. तसेच लहान नोटांसाठी आरबीआयने ‘स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर’ हा पायलट प्रोजेक्ट सुरू केला असून आता विशेष एटीएमद्वारे सुट्या नोटा मिळणार आहेत. एटीएम द्वारे आता पर्यंत २००, ५०० च्याच नोटा निघत होत्या. आता मात्र १०,२० व ५० च्या नोटा सुद्धा निघतील. बऱ्याच वेळा एटीएममधून पैसे काढताना फक्त ५०० किंवा २०० रुपयांच्या मोठ्या नोटा हातात येतात. ज्यामुळे दैनंदिन व्यवहारात सुट्या पैशांची मोठी अडचण निर्माण होते. मात्र, आता ही समस्या लवकरच सुटणार आहे.
नागरिक आता १०, २० आणि ५० रुपयांच्या लहान नोटा थेट एटीएममधून काढू शकणार आहेत. यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्मॉल व्हॅल्यू डिस्पेंसर नावाचा एक विशेष पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. अशी माहिती केंद्र सरकारने नुकतंच संसदेत माहिती दिली.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना या योजनेची माहिती दिली. हे एक प्रकारचे विशेष एटीएम असेल, जे केवळ १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा वितरित करण्यासाठी डिझाईन केलेले आहे.सध्याच्या पारंपारिक एटीएममध्ये कॅसेटची क्षमता मर्यादित असल्याने बँका मोठ्या नोटांना प्राधान्य देतात. या नवीन मशिनमुळे सर्वसामान्यांना किरकोळ खर्चासाठी बँकांच्या रांगेत उभे राहण्याची किंवा बाजारात सुट्या पैशांसाठी फिरण्याची गरज पडणार नाही.
अधिकृत आकडेवारीनुसार, २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १० रुपयांच्या ४३९.४० कोटी, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे. १० रुपयांच्या नोटांच्या पुरवठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. सध्या डिजिटल पेमेंटचा प्रभाव वाढत आहे. पण तरी ग्रामीण आणि निमशहरी भागात रोख रकमेची गरज लागते. ही गरज ओळखून आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.


