जंगलात हात पाय बांधले : डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मंडे टू मंडे वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील पाटणा जंगलात एका ५० वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करनारे नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे, तालुक्यातील गणेशपूर येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (वय-५०) हा पाटणा जंगलात गुरेढोरे सांभाळण्याचे काम करीत होते. रात्री अज्ञात मारेकऱ्याने त्यांचे हात-पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली. नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील यांच्या हत्येच्या मागे नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेले नाहीय. मारेकऱ्यांच्या शोधार्थ पथके रवाना झाले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली आहे. दरम्यान, निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे तपास करीत आहेत.