कन्नड घाटात दरडी कोसळल्याने वाहने आणि प्रवासी अडकले : युद्ध पातळीवर काम सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव, मंडे टू मंडे । कन्नड घाटात रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर काही ठिकाणी झाडे देखिल उन्मळून पडली असून सर्वत्र दगडांचा खच व चिखल असल्याने अनेक वाहने रस्त्यात अडकली आहे. त्यामुळे कन्नड घाटात वाहतुक खोळंबली आहे. कन्नड औरंगाबादकडे तसेच चाळीसगाव शहराकडे सुमारे आठ ते दहा कि,मी. अंतरापर्यत वाहने खोळंबली आहेत.
मुसळधार पावसामुळे कन्नड घाटात दरडी कोसळल्याने अनेक तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याने ही वाहतूक ठप्प झाली असून, अनेक वाहने आणि प्रवासी अडकले आहेत. औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. चाळीसगावसह परिसरात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तितूर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे चाळीसगाव शहरातील बऱ्याचशा भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर दुसरीकडे खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या कन्नड घाटात रात्रीच्या सुमारास दरडी कोसळल्याने मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून यामुळे दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता मोकळा करण्यात अनेक अडचणी येत आहेत.