एकाच दिवशी दोन जणांची क्रूर हत्या, चाळीसगाव तालुका हादरला
चाळीसगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चाळीसगाव तालुक्यात आज एकाच दिवशी तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवरात वेगवेगळ्या घटनेत दोन जणांची क्रूर हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने चाळीसगाव तालुका हादरला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील जामडी व चिंचखेडे शिवरात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून झाला आहे. जामडी गावात आज दुपारी पूर्ववैमनस्यातून दर्ग्यावरील फकीर तबरेश शहा याकूब शहा यांच्या पाठींत चाकून वार करुन, त्यांची हत्या करण्यात आली. तर चिंचखेडे शिवरात ५५ वर्षीय वृध्द राजेंद्र सुकदेव पाटील रा.देवळी यांच्या डोक्यात अज्ञात मारेकर्याने लाकडाच्या दांड्याने मारुन, त्याचा खून केला. ह्या घटनामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली असून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
मुकेश राजेंद्र पाटील (वय २३, रा. देवळी ता. चाळीसगाव) फिर्याद दिली आहे. त्यांचे वडील राजेंद्र सुकदेव पाटील यांचा अज्ञात व्यक्तींनी खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाटील कुटुंब गावातील विमलबाई रामलाल पाटील यांची चिंचखेडे शिवारातील शेत जमिन निमबटाईने सुमारे ७ वर्षापासुन करीत आहेत. शेतात कांद्याचे पत्र्याचे शेड असुन तेथे गुरे असल्यामुळे राजेद्र सुकदेव पाटील हे नेहमी रात्री झोपायला जात असे. दि.७ जून रोजी रात्री सुमारे १० वाजता राजेद्र पाटील हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री कोणीतरी अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचा दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून जीवे ठार केले
जामडी येथील घटनेत पोलिसांनी घटनास्थळावरुन रक्तांने माखलेला चाकू जप्त केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या करण्यात आल्याने तालुका हादरला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या दोन्ही घटनांच्या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.