जळगाव जी. प. च्या उप अभियंत्यास चार लाखाची लाच स्वीकारतांना अटक
चाळीसगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। क्लस्टरच्या कामाची अतिरिक्त अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना जिल्हा परिषदेचा उप अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते याना रंगेहात अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे जि.प. च्या बांधकाम विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला आहे.
या संदर्भातील अधिक वृत्त असे की, तक्रारदार यांनी डॉ . शामा प्रसाद मुखर्जी रुरबन’ या शासकीय योजनेच्या माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता. चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसित करण्याचे काम घेतले होते. या कामाची ४ कोटी ८२ लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाचे अतिरिक्त सुरक्षा अनामत रक्कम ३५ लाख रुपये मिळवून देण्याचे मोबदल्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते, वय ५७, रा. अशोक नगर, धुळे. यांनी तक्रारदाराला पाच लाख रूपयांची मागणी केली होती. या संदर्भात संबंधीत कंत्राटदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. नाशिक एसीबीच्या पथकाने ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते यांना चार लाख रूपयांची लाच स्वीकारतांना रंगे हाथ अटक केली. या संदर्भात चाळीसगावला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक एसीबीच्या अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक स्वप्नील राजपूत यांच्या नेतृत्वाखालील प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, अविनाश पवार, सुरेश चव्हाण यानी केली.