लाच स्वीकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !
जळगाव (प्रतिनिधी)। मयत वडीलांच्या नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांची नावे लावण्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष शिखरे लाचेची मागणी केली होती. चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे शिवारातील शेतीच्या सातबारा उताऱ्यावर घरातील सदस्यांची नावे लावण्याच्या मोबदल्यात लाच घेणे तलाठ्यास महागात पडले.
या कामासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतांना तांबोळे येथील तलाठी संतोष प्रताप शिखरे यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. दि.२६ च्या दुपारी ही घटना घडली. तक्रारदाराचे वडील मयत झाले आहेत. मयत वडीलांच्या नावे असलेल्या शेतीला घरातील सदस्यांची नावे लावण्याच्या मोबदल्यात तलाठी संतोष शिखरे यांनी ३१ जुलै रोजी तक्रारदाराकडे पंचासमक्ष दोन हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यावर इसार पेट्रोलपंपाजवळ संतोष शिखरे या तलाठ्यास दोन हजार रुपयांची लाच घेतांना सापळा लावलेल्या एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. एसीबी चे डीवायएसपी सुनिल कुराडे, पीआय. निलेश लोधी, सहा.पोलीस उप निरीक्षक रविंद्र माळी,पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर आदी या पथकात होते. त्यांनी सदर कारवाई यशस्वी केली.