ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार, सरपंच अपात्र, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ग्रामसभा न घेणे, खोटे प्रोसिडिंग करणे, आर्थिक गैरव्यवहार करणे असे विविध आरोप करत जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंचांबाबत तक्रार केली होती. दरम्यान, याबाबत चा अर्ज जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दि. ३० डिसेंबर सोमवार रोजी निकाली काढत वावडदा सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वावडदा गावचे सरपंच राजेश नारायण वाडेकर यांनी आपल्या स्वतः च्या मर्जीप्रमाणे ग्रामपंचायत मध्ये कारभार करून सर्व नियम धाब्यावर बसवले. पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या कामांचं नियमानुसार वाटप केलेले नाही. तसेच कोणत्याही कामांचे ई-टेंडर केलेले नाही. असा अनागोंदी कारभार करून शासकीय निधीचा गैरवापर केला आहे. तसेच ग्रामपंचायत सामग्रीचा कुठल्याही प्रकारे लिलाव न करता परस्पर विक्री करून अपहार केला आहे असे विविध आरोप तक्रार अर्जामध्ये करण्यात आले होते. सदर अर्जावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सुनावणी सुरू होती. सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी जिल्हा न्यायदंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी निकाल देऊन सरपंच राजेश वाडेकर यांना अपात्र घोषित केले आहे.
तक्रार अर्जावर सदस्य अनिल आत्माराम पाटील, राजेंद्र रामदास मराठे, राकेश नामदेव भिल, भारती संतोष पवार, रत्नाबाई मुकुंदा पाटील, वर्षा विनोद पवार यांच्या सह्या आहेत.