नासाच्या फोटोंवरून भारताच्या आशा पल्लवित; चंद्रयान -2 चे प्रज्ञान रोव्हर’ ठीक असल्याचा दावा !
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) 22 जुलै 2019 रोजी चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-2 बाबत चेन्नईतील इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी मोठा दावा केला आहे. चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान -2 चा रोव्हर प्रज्ञान एकदम ठीक आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर रोव्हर काही मीटर पुढे गेल्याचा देखील इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी दावा केला आहे. त्यानंतर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले आहेत, ‘आम्हाला सुब्रमण्यम यांच्याकडून माहिती मिळाली आहे. आमचे तज्ज्ञ या प्रकरणाचे विश्लेषण करीत आहेत.
नासाद्वारे जारी केलेल्या फोटोंच्या माहितीनुसार, शनमुग सुब्रमण्यम यांनी ट्विट केले आहे. या ट्विटनुसार, रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. रफ लॅन्डिंगमुळे चांद्रयान 2 चा रोव्हर प्रज्ञान, विक्रम लँडरपासून वेगळा झाला आहे. त्यामुळे त्याचे कमांड्स पृथ्वीवर येऊ शकत नाहीत. कदाचित त्यांना मेसेज मिळाले देखील असतील. मात्र, रोव्हर त्याचा रिप्लाय देण्यासाठी सक्षम नसेल, कदाचित त्यामुळेच पृथ्वीवर त्याचा कोणताही संपर्क झाला नसेल. शनमुग सुब्रमण्यन यांनी आपल्या ट्विटरवर याबद्दल बरेच ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले आहे, “1) मी शोधलेला ढिगारा विक्रम लाँडरचा होता. 2) नासानेजो ढिगारा शोधला तो कदाचित इतर पेलोड, अँटिना, रेट्रो ब्रेकिंग इंजिन, सोलार पॅनेल किंवा इतर गोष्टींचा होता. 3) प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला होता आणि तो काही मीटरही चालला होता.”
दरम्यान, इसरोने 22 जुलै 2019 रोजी चांद्रयान -2 ही महत्वाकांक्षी मोहीम लाँच केली होती. या मोहिमेअंतर्गत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविण्यात आले. मात्र, 6 सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंगवेळी त्यांचा इस्रोशी संपर्क तुटला. यापूर्वीही सुब्रमण्यम यांनी विक्रम लँडरचा ढिगारा नासाच्या छायाचित्रांद्वारे सापडल्याचा दावा केला होता. यावेळी तो प्रज्ञान रोव्हर सापडल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे भारतीय संशोधकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.