मुख्यमंत्र्यांचं लाडक्या बहिणींना अत्यंत महत्त्वांच आवाहन, महीला भगिनींनो घाबरून जाऊ नका..
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा सुरु आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिला तलाठी कार्यालय, तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत. अनेक महिलांकडून कागदपत्रे बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यभरातील महिलांकडून या योजनेसाठी अर्ज केले जात आहेत. कागदपत्रांमध्ये पूर्तता झाली नाही किंवा काही गोष्टी चुकून सुटून गेल्या तर आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही, अशी भीती काही महिलांना आहे.
पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व महिलांना निश्चिंत राहण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील महिला भगिणींनी घाबरुन जाण्याची गरज नाही. सर्वांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसेच प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून या योजनेची पूर्तता करताना काही चूक झाली, किंवा दिरंगाई करण्यात आल्याचं लक्षात आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
“एका चॅनलवर बातमी सुरु होती, बुलढाण्याच्या तलाठीने महिला भगिणीबरोबर अरेरावी केली. महिला भगिणींची गैरसोय केल्यानंतर मी कलेक्टरला तात्काळ फोन केला. मी तात्काळ त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना दिल्यानंतर कलेक्टरने मला परत फोन केला. महिला भगिणींची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन कलेक्टर यांनी दिली आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
‘व्यापक विचार घेऊन आम्ही ही योजना सुरु केली’
“मी जाहीरपणे सर्व कलेक्टर आणि विभागीय आयुक्त यांना कालच सूचना दिलेल्या आहेत. आपल्या जिल्ह्यातील तहसीलदार, प्रांत, तलाठी, कर्मचारी असतील, या सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही ज्या जिव्हाळ्याने सुरु केली आहे, महिलांना आर्थिक साहाय्य मिळायला हवं, वर्षाला 18 हजार रुपये महिलांना मिळायला हवेत. एक व्यापक विचार घेऊन आम्ही ही योजना सुरु केली आहे. तसेच ३ सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही योजना आम्ही महिला भगिणींसाठी केल्या आहेत. त्यामुळे आमच्या सर्व प्रशासनाला सूचना आहेत, शासनाने ज्या आत्मीयतेने या योजना सुरु केल्या आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी महिलांना मिळायला पाहिजे. महिलांची गैरसोय होऊ नये, अडचण होऊ नये, कुणीही पैशांची मागणी करता कामा नये, अशा प्रकारचे सक्त आदेश दिले आहेत. यामध्ये जो लापरवाई करेल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, हेही आम्ही सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.