बिग ब्रेकिंग | मदरशांच्या ड्रेसमध्ये लहान मुलांची तस्करी; मनमाड व जळगावात ५९ मुलांची सुटका !
भुसावळ, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांनी मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड केले आहे. बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या (Child Trafficking) तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. बिहारहून महाराष्ट्रात रेल्वेने प्रवास करत दाखल झालेल्या ३० अल्पवयीन मुलांना मनमाडमध्ये तर २९ लहान मुलांना जळगाव रेल्वे स्थानकावर सोडवण्यात आलं. या प्रकारामुळे तस्करीचे मोठे रॅकेट उघड होणार आहे.
मुलांना सांगली येथील मदरशामध्ये तस्करी करुन नेण्याचा डाव भुसावळ (Bhusawal Railway) रेल्वे सुरक्षा बल तसेच लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने हाणून पाडला आहे. दानापूर-पुणे एक्स्प्रेस मधून तस्करी करून नेण्यात येणाऱ्या ५९ मुलांची भुसावळ ते मनमाड स्थानकादरम्यान ३० मे रोजी सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मुलांच्या तस्करी करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुलांपैकी काही मुलांना जळगाव आणि नाशिक येथील उंटवाडी परिसरातील बालसुधार गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा बलाच्या केलेल्या चौकशीत सदर मुलांची मदरशाच्या नावाखाली सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून मुलांना मदरशाचा ड्रेस घालण्यात आला होता. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सदरहू पाच संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
भुसावळ ते मनमाड दरम्यान एक्सप्रेस मध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांडून मनमाडपर्यंत प्रवासात रेल्वे गाडीत शोध मोहिम राबविण्यात आली. या रेल्वे गाडीत आणखी ३० मुले आणि ४ संशयित तस्कर मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेत मनमाड रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात आले. भुसावळ येथे मिळून आलेल्या २९ मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील ३० मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
मुलांसोबत असलेल्या तस्करी करणाऱ्या एकूण पाच जणांवर कलम ४७० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ मुलांना चाइल्ड हेल्प डेस्कच्या एनजीओमार्फत सीडब्ल्यूसी जळगावला पाठवण्यात आले. तर मनमाड येथे सुटका झालेल्या ३० बालकांना चाइल्ड हेल्प डेस्क एनजीओ नाशिक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.