मुक्ताईनगरमध्ये अवैध उत्खननावर नागरिकांची कारवाई ; चार डंपर व पोकलेन जप्त
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज.अक्षय काठोके | मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ईदगाह परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवैध उत्खनन करत असलेले चार डंपर व एक मोठे पोकलेन पकडून ते पोलिसांच्या ताब्यात दिले.
घटनेनंतर पकडलेली वाहने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आली. यावेळी पोलीस स्टेशन परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अवैध उत्खननाविरोधात संताप व्यक्त करत नागरिकांनी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार, जप्त करण्यात आलेले पोकलेन व डंपर हे बी. एन. अग्रवाल यांच्या मालकीचे असून या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अवैध उत्खनन केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरिकांनी तत्काळ काम बंद पाडून संबंधित वाहने पोलीस स्टेशनमध्ये जमा केली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर शहर व परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर डंपर व यंत्रसामग्री पकडली गेल्याने प्रशासन पुढे काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


