आजपासून राज्यात बारावीची परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएसचा लाइव्ह ट्रॅकिंग होणार आहे. ही परीक्षा राज्यातील ३ हजार ३७३ केंद्रावर होणार असून या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
परीक्षा केंद्रावर व्हिडीओ चित्रीकरणही होणार आहे. इतकंच नाही तर संवेदनशील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीचा वॅाच असणार आहे. कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येत असून परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलेली आहे. शिक्षण मंडळाकडून परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी २७१ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निर्धारित वेळे पेक्षा १० मिनिटे अधिक मिळणार
आज पासून राज्यातील नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, कोकण आणि लातूर या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा सुरु होत आहे. या वर्षीही परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. सर्व पेपर बोर्डाकडून कस्टोडियनपर्यंत पोहचले आहे. ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी कस्टोडियन पोहचून लाईव्ह लोकेशन देणार आहे
तर विभागीय मंडळानी असा इशारा दिला आहे की,
परीक्षे दरम्यान केंद्रावर कॉफीचा अथवा काही गैरप्रकार आढळला तर त्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार. दरम्यान, परीक्षेचा निकाल १५ मे पर्यंत लावण्याचे उद्दिष्ट मंडळाने ठेवले आहे.