राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका, गारठा वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळं राज्यातील गारठा कमी झाला होता. किमान तापमान १० अंशाच्या वर गेले होते. मात्र आजपासून पुन्हा एकदा तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. असे असताना मात्र, काही ठिकाणी पाऊस धुमाकुळ घालणार असल्याचा अंदाज आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पसरले होते. ढगाळ वातावरण कमी झाल्याने गारठा कमी झाला होता. मात्र आता गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा गारवा जाणवायला लागला आहे. रविवारी धुळे येथे १० अंश च्या खाली सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात आकाश स्वच्छ असून उद्यापासून किमान तापमानात घट होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये थंडीचा जोर पाहायला मिळू शकतो.
उत्तर भारतात थंडीच्या लाटेची स्थिती आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. एकंदरीत मागील दोन तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ हवामानाचे सावट आता सरणार असून राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी परतणार आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश पाहायला मिळणार असून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. उत्तर राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.