काँग्रेस इच्छुकांचा आ. शिरीष चौधरींच्या घराणे शाहीला उघड विरोध, निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी !
यावल, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | रावेर – यावल मतदार संघासाठी आगामी विधानसभा निवडणुक उमेदवारी साठी काग्रेस मध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या आधीच रावेर चे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी रावेर – यावल विधानसभा मतदारसंघात काँगेस कडून उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून आधीच दंड थोपटले आहेत. आता त्यात भर म्हणून इच्छुक उमेदवारांमध्ये रावेर चे माजी उप नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, व इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील हे मैदानात उतरले असून इच्छुक उमेदवार असल्याची माहिती शुक्रवार रोजी यावल सहकारी खरेदी विक्री संघाचे सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
विद्यमान आमदारांवर उघड नाराजी,घराणे शहीला विरोध
रावेर – यावल विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ. शिरीष चौधरी यांचेवर या वेळी उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार चौधरी यांनी त्यांचे सुपुत्र धनंजय चौधरी यांना आपले राजकीय वारस म्हणून नुकतेच जाहीर केले. याबाबत पत्रकार परिषदेत पदाधिकारी व वक्त्यांसह इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत विद्यमान आमदार काँग्रेस कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेत नसल्याचा आरोपही या वेळी करण्यात आला. तसेच घराणे शाही लादू नये अशी मागणी उघड या वेळी करण्यात आली. आणि निष्ठावंतांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या आधीही इच्छुक उमेदवार दारा मोहम्मद यांनी रावेर – यावल मतदार संघाचा पाहिजे तसा विकास झाला नसल्याचा आरोप केला होता.
यावल तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सभागृहात जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी इच्छुक उमेदवारांचा काँग्रेस मधील सुमारे ४०-५० वर्षासह त्यांचे राजकीय जीवनातील कार्याचा परिचय दिला.त्यात काँग्रेसचे रावेर नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन तसेच इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील हे इच्छुक उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यात या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांचा सर्व सामाजिक क्षेत्रात असलेला दांडगा जनसंपर्क व त्यांचे नगराध्यक्ष काळातील विकास कामांच परिचय देत सामाजिक क्षेत्रातील त्यांची धडपड पाहता ते कांग्रेस उमेदवार म्हणून विधानसभेवर निश्चित निवडून येतील असा आत्मविश्वास ही त्यांनी व्यक्त केला. या वेळी इच्छुक उमेदवार दारा मोहम्मद, ज्ञानेश्वर महाजन,व भगतसिंग पाटील यांनी त्यांचे विचार व्यक्त केले, या वेळीं या इच्छुक उमेदवारांनी एकमत करून आम्हा तीन इच्छुक उमेदवारांपैकी पक्षाने कोणासही उमेदवारी दिली तर एक दिलाने काम करण्याची व रावेर विधानसभा क्षेत्राचा विकास करणार असल्याची ग्वाही देत उमेदवाराला निवडून आणण्याची ग्वाही या वेळी देण्यात आली.
या वेळी रावेरचे आर.के.चौधरी, माजी नगरसेवक गोपाल बिरपन, यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष मुस्तफा सुब्हान खान, अन्सार खान निसार खान, हाजी इक्बाल खान निसार खान, नावरे येथील माजी सरपंच समाधान पाटील, खालील खान असे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.