ब्रेकिंग! देशात आता लहान मुलांनाही कोरोनाची लस; २ ते १८ वर्षाच्या मुलांच्या ट्रायलला मंजुरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली/वृत्तसंस्था: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान माजवलेले असतांना दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे समोर आले आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे भारतातही लहान मुलांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर २ ते १८ वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची शिफारस नुकतीच तज्ज्ञांकडून करण्यात आली होती. या लसीच्या ट्रायलला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच लहान मुलांनाही लस देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. दरम्यान ही शिफारस मान्य करण्यात आली आहे.
भारत बायोटेक कंपनीला २ ते १८ वर्षांच्या मुलांवर कोरोनाच्या लसीची ट्रायल करण्याची सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC)ने शिफारस केली होती. त्याला मंगळवारी मंजुरी देण्यात आली आहे. सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (SEC) भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला २ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या फेज २ आणि ३ मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. ही क्लिनिकल ट्रा्यल ५२५ मुलांवर केली जाणार आहे. दिल्ली एम्स, पाटना एम्स आणि नागपूर एम्समध्ये ही ट्रायल होणार आहे.
भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस कोरोना विरोधातील लढाईत प्रभावी ठरत आहे. कंपनीकडून ही लस ८१ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर भारत बायोटेकची लस प्रभावी असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला गेला आहे. त्यामुळे २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या अनुषंगाने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी कोवॅक्सिन लसीचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला. कोरोनाच्या हाहाकारात २ ते १८ वयोगटातील लसीकरणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.