कोरोना उपचारासाठी आणखी एका औषधाला मान्यता; रुग्णांची ऑक्सिजनची गरज संपणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली/वृत्तसंस्था : देशभरात कोरोनाचा उद्रेक सुरु असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाच्या वापराला आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्यूरल अॅंड मॉलिक्युलर बायोलॉजी (CCMB) यांनी एकत्र येत या औषधांची निर्मिती केली आहे. या औषधाला सध्या 2-deoxy-D-glucose (2-DG) असं नाव देण्यात आलं आहे. या औषधाच्या उत्पादनाची जबाबदारी हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबरोटरिजवर देण्यात आली आहे.
हे औषध क्लीनिकल चाचणीत यशस्वी ठरलं आहे. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होणे ही मोठी समस्या आहे. यामुळे रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. यासाठी 2-DG हे औषध फायदेशीर ठरणार आहे. कारण क्लिनिकल ट्रायलमधील परिणामांनुसार, कोरोनाबाधित रुग्ण कमी वेळेत रिकव्हर होतात. तसेच रुग्णांना रुग्णांलयात ऑक्सिजनचा वापरही कमी करावा लागत आहे. इतर उपचार पद्धतीच्या तुलनेने 2-DG च्या वापराने रुग्ण कमी वेळेत कोरोनावर मात करत आहेत, म्हणजे कोरोनोबाधित रुग्ण कमी वेळेत बरे होत आहेत. दावा आहे की, या औषधाचा वापर ज्या रुग्णांवर केला गेला त्यांच्यात वेगाने बरे होण्याचे प्रमाण दिसले. त्याचसोबत जे रुग्ण ऑक्सिजनवर निर्भर होते ते कमी झाले. या औषधाच्या वापरामुळे रुग्णांचा कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह आला आहे. म्हणजेच हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.
डीआरडीओच्या वैज्ञनिकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधावर काम सुरु केलं होतं. यावेळी कोरोनावर हे औषध अत्यंत प्रभावशाली असल्याचं वैज्ञानिकांच्या लक्षात आलं. या आधारे DCGI ने मे 2020 मध्ये या औषधाच्या फेज 2 ट्रायलला मंजुरी दिला होती. 2DG औषधाच्या ट्रायलचा पहिला टप्पा सहा रुग्णालयांमध्ये घेण्यात आला आणि देशभरातील 11 रुग्णालयात फेज (डोस रेंज) क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. दुसर्या टप्प्यात 110 रुग्णांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली. फेज ३ मध्ये डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान देशातील २७ हॉस्पिटलमध्ये चाचणी घेतली. यात २२० रुग्णांचा समावेश होता. ही चाचणी दिल्ली, यूपी, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूत झाली. ज्या रुग्णांना 2 DG हे औषध दिलं त्यातील ४२ टक्के रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरज तिसऱ्या दिवशी संपली. परंतु औषध न घेतल्याला ३१ टक्के रुग्णांना ऑक्सिजनवर निर्भर राहावं लागत होतं. म्हणजे हे औषध मेडिकल ऑक्सिजनची आवश्यकता कमी करतं. यात ६५ वर्षावरील वृद्धांमध्येही जे जाणवून आलं.
हे औषध पावडरच्या स्वरुपात दिलं जातं. जे पाण्यात मिसळून प्यायचं असतं. हे औषधं संक्रमित कोशिकांमध्ये जमा होतं आणि व्हायरल सिंथेसिस आणि एनर्जी निर्माण करणाऱ्या व्हायरसला रोखतं. हे औषध खूप फायदेशीर ठरत आहे. देशात वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. अशातच या औषधाच्या वापरामुळे रुग्णांना जास्त काळ हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज पडणार नाही असं दावा केला जात आहे.