Corona Update। आता ७ दिवसात कोरोना रुग्ण बरे होणार, औषधाला DGCI ची मंजूरी
Monday To Monday NewNetwork।
नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोरोना संसर्गाने थैमान घातले असतांना सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती लसींपासून रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंत अनेक गोष्टीचा तुटवडा भासत आहे. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे देशात आपात्कालीन वापरासाठी दोन लसींना मान्यता देण्यात आली होती. मात्र, रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी झायडस कॅडिलाच्या (Zydus cadila) विराफिन (Virafin) या अँटिव्हायरल औषधाला आपात्कालीन वापरासाठी DCGI कडून मंजुरी मिळाली आहे.
झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा – 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. माहितीनुसार कोरोनावर झायडस कॅडिलाचे ‘विराफिन’ हे औषधं ९१.१५ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आलं असून हे औषध घेतल्यानंतर ७ दिवसात कोरोना बरा होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिलाच्या या औषधांचे क्लिनिकल ट्रायल झाले असून यामध्ये ९१ टक्के जास्त कोरोनाबाधित लोकांना फायदा झाल्याचे समोर आले. ७ दिवसांमध्ये कोरोनाबाधित लोकांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. एवढेच नाहीतर जे ऑक्सिजनवर रुग्ण होते त्यांना हे औषधं दिल्यामुळे त्यांच्या ऑक्सिजन वापराचे प्रमाण कमी झाले आहे, असे निष्कर्षातून निघाले असल्याचे कंपनीने सांगतिलं आहे. दरम्यान जरी आज DCGI कडून आपात्कालीन वापरासाठी या औषधाला मान्यता मिळाली असली तरी हे औषधं सर्वांना दिले जाणार नाही आहे. हे औषधं फक्त प्रौढांना आणि जे देखरेखी खाली असलेल्या रुग्णांच्या वापरासाठी मिळणार आहे. गंभीर रुग्णांना हे औषधं दिले जाणार नाही आहे. या औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीनं सांगितलं.