पहिली कोरोना वरील लस रशियामध्ये लॉंच !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना, रशियातून एक चांगली बातमी आली आहे. रशियाच्या कोरोना लशीला आरोग्य मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. एवढेच नाही तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितले. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे.
रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. रशियाने फिलिपिन्सला (Philippians) त्यांची कोरोना लस देण्याची ऑफर दिली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी ही ऑफर मान्य केली आहे, एवढेच नाही तर या लशीचा पहिला डोस ते स्वत: घेणार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, “जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा सर्वात आधी मी माझ्यावर प्रयोग करणार आहे. मला काही हरकत नाही.” दुतेर्ते यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपले आदर्श असल्याचे याआधीच सांगितले होते. या लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये फिलिपिन्सने रशियाला मोठी मदत केली होती. मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्युटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.