भर दिवसा बंदुकीच्या धाकावर कापूस व्यापाऱ्याचे ७ लाख नेले लुटुन !
मंडे टू मंडे वृत्तसेवा : जामनेर तालुक्यात एका कापूस व्यापाऱ्याला बुधवारी सकाळी आठच्या सुमारास आपल्या दुचाकीनं पहुरकडे जात असतांना दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी व्यापाऱ्यांच्या दुचाकीला आडवून त्यांच्याकडी सात लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक असे, संजय रामकृष्ण पाटील बुधवारी सकाळी आपल्या दुचाकीने पहुरकडे चालले होते. सोनाळा येथील तलावाजवळून जात असताना, समोरून दोन दुचाकीवरुन आलेल्या चार भामट्यांनी त्यांना अडवलं. आरोपींनी फिर्यादीला बंदूक आणि चाकुचा धाक दाखवत त्यांच्या गाडीच्या हँडलला अडकवलेली पैशांची बॅग घेऊन पळ काढला. यावेळी संजय पाटील यांच्यासोबत गावातील 13 वर्षीय हितेश नाना पाटील हा लहान मुलगा देखील होता. स्वत: सोबतच लहानग्या हितेशला काही ईजा पोहचू नये. म्हणून संजय पाटील यांनी अज्ञात चोरट्यांचा कोणताही प्रतिकार केला नाही. अशाप्रकारे दिवसा-ढवळ्या बंदुकीच्या धाकावर झालेल्या चोरीनं परीसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पाटील यांच्या फिर्यादिवरून पहुर पोलीस ठाण्यात विविध कलमाअंतर्गत चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पहूर पोलीस करत आहेत.