२ ते १८ वयोगटाच्या लहान मुलांवर Covaxin लसीच्या वापराला DCGI ची मंजुरी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,वृत्तसंस्था। लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात एक आनंदाची बातमी आहे. आता देशात २ ते १८ वयोगटातील लहान मुलांना कोवॅक्सिन ही लस दिली जाणार आहे. लहान मुलांसाठीच्या या कोवॅक्सिन लसीची निर्मिती भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून केली आहे. या लसीला आता DCGI ने मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशात लहान मुलांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला लवकरचं सुरुवात होणार आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीची ही लस आहे.
देशात सध्या १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. मात्र १८ वर्षांच्या आतील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु केले नव्हते. यात आता महाराष्ट्रात शाळा- कॉलेज सुरु होत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता पालकांना मुलांच्या आरोग्याबाबत चिंता सतावत होती. पण आता देशात लवकरचं लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होत असल्याने चिंता दूर झाली आहे.
लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारकडून लवकरचं मार्गदर्शक सुचना जाहीर करण्यात येतील. लहान मुलांनाही प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. या लसीच्या आत्तापर्यंत केलेल्या चाचण्यांमध्ये मुलांवर कोणताही दुष्परिणाम झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ज्या मुलांना दमा किंवा इतर गंभीर आजार आहेत त्यांचे डॉक्टरांच्या सल्लानुसार लसीकरण आधी करण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सुचनेनुसार सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस मोफत दिली जाईल.