महाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयांना ईडीकडून अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुंबई , प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना अटक झाली आहे. रात्री गिरीश चौधरींची ईडीकडून कसून चौकशी केल्यानंर त्यांना अटक करण्यात आली. एकनाथ खडसे यांना सर्वात मोठा दणका मानला जात आहे.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

याप्रकरणात खडसेंनी आपली भूमिका मांडली होती, “एमआयडीसीच्या जमिनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, एक इंचही जमीन मी घेतली नाही. माझा व्यवहार झालेला नाही. उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आहे, एमआयडीसीचे नाव नंतर आहे. मुळात मी महसूल मंत्री होतो, म्हणून पदाचा गैरवापर करण्याचा काय संबंध? माझ्या बायको आणि जावयाने काय व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीस यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांच्या पदाचा गैरवापर होतो का? किंवा त्यांनी एखादा कार्यक्रम केला, तर काय फडणवीस यांच्या आशीर्वादाने झाला, असे होते का? त्यांच्या त्या स्वतंत्र आहेत. तशी माझी बायको स्वतंत्र आहे, माझा जावई एनआरआय आहे, त्यालाही अधिकार आहेत” असं खडसे काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!