बाप-लेकाने गुंगीचे औषध देऊन दागिन्यांच्या लोभापायी ‘त्या’ महिलेचा केला खून !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर कुंड गावाजवळ असणाऱ्या पूर्णा नदी पात्रावरील पुलाच्या खालील बाजूस जाड प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेह व खुन्यांना शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आवाहन होते. परंतु दोन दिवसात या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ओळख पटली असून त्यांचा अतिशय क्रुरपणे खून करण्यात आला असून दोघे आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबतची माहिती अशी की, मलकापूर न.प.च्या सेवानिवृत्त कर्मचारी श्रीमती प्रभा माधव फाळके (वय ६३ ) रा. गणपती नगर भाग २ ह्या २७ ऑगस्ट रोजी परिसरातच असलेल्या मंदिरामध्ये पुजेची थैली घेवून दर्शनासाठी जात असल्याचे मुलाला व सुनेला सांगून घरून निघून गेल्या होत्या. २९ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गावर संत मुक्ताबाई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ असणाऱ्या पुलाच्या खालील बाजूस एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्या महिलेची ओळख पटली नव्हती. पुलाच्या खालील बाजूस असलेला मृतदेह पोलिसांनी पुलाच्या वर काढला. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविली आणि मलकापूर पोलिसांची संपर्क साधण्यात आला.
त्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मलकापूर शहरात येवून या खूना बाबत माता महाकाली नगर, एसटी बसस्थानक, गणपती नगर व अन्य ठिकाणी चौकशी केली. अखेर त्या अनोळखी महिलेचा मुक्ताईनगर येथे प्लास्टीकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह हा मलकापूर येथील प्रभा फाळके यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या घराशेजारील विश्वास भास्कर गाडे वय( 48) व भार्गव विश्वास गाडे मलकापूर वय 24 दोघे रा. मलकापूर या दोन्ही पिता पुत्रास संशयीत म्हणून अटक केली असून दोघानी महिलेस गुंगीचे औषध देवून तिच्या अंगावरील दागिने व काही रक्कम बळकाविण्याच्या हेतुने केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पो.स्टे. चे एपीआय शेवाळे हे अधिक तपास करीत आहे.