विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या नावाचा वापर करत एका बेरोजगारास तब्बल २१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. संबंधिताने याबाबतची तक्रार दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. सध्या राधाकृष्ण गिमे हे नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत. गिमे महापालिकेचे माजी आयुक्तही आहेत.
सरकारी नोकरी लागणार म्हटले की, बेरोजगार काहीही करायला तयार असतो. अनेक जण राज्य सेवा परीक्षेसाठी रोज सोळा-सोळा तास अभ्यास करतात. तर काही जणांना झटपट नोकरी हवी असते. मात्र, प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळेल याची खात्री सध्याच्या स्पर्धेचे युगात तर देता येत नाही. मात्र, अनेक जण पैसे देऊन नोकरी लावतो म्हणतात. याला बेरोजगारही भुलतात. त्यांच्या थापाला बळी पडतात. नेमका असाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. नाशिक महापालिकेचे सध्याचे आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे एक तक्रार आली आहे. त्यानुसार व्हॉल्व्हमनपदासाठी एका व्यक्तीकडून तब्बल 21 लाख रुपये उकळल्याचे समजते. इतके पैसे घेऊन बेरोजगारास 2020 मध्येच नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये राधाकृष्ण गिमे हे महापालिका आयुक्त होते. त्यांच्या कार्यकाळातील बनावट डिजीटल स्वाक्षरीचा वापर करून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
तक्रारदाराने महापालिका प्रशासनाला बनावट स्वाक्षरीचे बोगस नियुक्तीपत्र दिले. प्रशासनाने या पत्राची चौकशी सुरू केली आहे. आयटी विभागाकडे हे पत्र देण्यात आले असून, माजी आयुक्तांची डिजीटल स्वाक्षरीचा वापर कोणी केला, यात महापालिकेतील संबंधित कोणी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.