डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; पोलीस पती अटकेत
पाचोरा (प्रतिनिधी)। तालुक्यातील माहिजी येथील तलाठी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या व पोलीस दलात असलेल्या पतीने तलाठी पत्नीचा अवजड वस्तु डोक्यात मारुन खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील मौर्या नगरमधील रहिवासी तथा तालुक्यातील माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (वय ४२) यांचे भाऊ हे मुंबई येथे पोलिस दलात सेवेत असतांना त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्युबाबतचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी अरुणा ह्या मुंबई येथे गेल्या असता त्यांची भेट पोलिस दलात नोकरीस असलेले नितीन मोतीलाल पवार यांचेशी झाली. नितीन यांने अरुणा हिचा विश्वास संपादन करुन माझा पहिला विवाह झाला असुन माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही व मी पण आपल्या समाजाचा आहे असे खोटे सांगुन अरुणाला विवाहाची मागणी केली होती. यानंतर त्यांचा २२ सप्टेंबर २०१७ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर नितीन पवार हा नियमित अरुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असुन तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत असे, अशी माहिती मिळाली. अरुणा हिने सदरचा प्रकार आपल्या आईस सांगितल्यानंतर आईने नितीन याच्या स्वभावात बदल होईल असे सांगितले.
अरुणा ही तलाठी पदावर कार्यरत असल्यामुळे तिला तहसिल कार्यालयातुन कार्यालयीन कामकाजाबाबत व शेतकर्यांचे फोन येत असत. याचा नितीनला राग येवुन तिच्या चारित्र्यावरच संशय घेत असे. शेवटी याच विषयावरुन नितीन व अरुणामध्ये दि. २९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांडण झाले. त्यात नितीन मोतीलाल पवार याने अवजड वस्तु डोक्यात मारुन पत्नीचा खुन केला. पोलिस दलात असल्यामुळे नितीन याने पळवाट काढण्याचा प्रयत्न करत शेजारील नागरिकांना खोटी बतावणी करत अरुणा ही घरातील पायरी वरुन पाय घसरुन पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. असे सांगुन अरुणा हिस खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले होते.
दरम्यान, पोलिसांनी नितीन यांच्याकडे कसून चौकशी केली. त्याने पत्नी अरुणा हिचा खून केल्याचे कबुल केल्याचे पोलिसांना सांगितले. दरम्यान, घटनास्थळाची पाहणी केली असता, पतीचा जिन्यावरून पडल्याचा बनाव खोटा असल्याचे पोलिसांना दिसले. निरीक्षण केले असता, जिन्याला ३० पायऱ्या असून तेथून अरुणा पवार हि पडली असती तर, शरीराला सर्व बाजूने जखमा झाल्या असत्या मात्र, फक्त डोक्यात मार लागल्याचे दिसून आले. तसेच दवाखान्यात आणल्यावर ती मयत अवस्थेतच होती. असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान पोलीस असणार्या तिच्या पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी नितीन पवार हा मुंबई येथील नायगाव मुख्यालयात असतांना सातत्याने गैरहजर राहत असल्याने, त्याला निलंबित करण्यात आले आहे. यावेळी पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, अजय मालचे, मुकुंद परदेशी यांनी सदरील तपास करुन घटना उघडकीस आणली.