व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी : लग्नाच्या आमिषाने बलात्कार, महिला पोलिस अधिकाऱ्यांचा आरोप
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
मुंबई, वृत्तसंस्था : लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप मुंबईतील महिला पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. बँक अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीविरोधात पवई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्कारासह धमकी आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणी पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याने एकूण तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुख्य आरोपी मूळ औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. आपण बँक अधिकारी असल्याचा दावा त्याने केला आहे. सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून तक्रारदार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि आरोपीची ओळख झाली. त्यानंतर दोघं रिलेशनशीपमघ्ये होते. आरोपीने पीडितेसोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यानंतर तिला त्रास देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा उल्लेख एफआयआरमध्ये केला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देत आरोपी आणि त्याच्या दोघा सहकाऱ्यांनी पीडितेचे ब्लॅकमेलिंग केले, असा आरोपही करण्यात आला आहे. त्रासाला कंटाळून महिलेने शुक्रवारी पवई पोलिसात तक्रार नोंदवली. बलात्कार आणि फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.