Big Breaking : माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडी कडून अटक
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्या प्रकरणी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांना आरोपी करण्यात आले आहे. संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. संजय पांडे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीदेखील हा धक्का आहे. दरम्यान, NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केला होता, असा त्यांच्यावर आरोप होता.
NSE घोटाळा प्रकरणी कंपनीचे टॉप मॅनेजमेंटमधील अधिकारी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि आनंद्र सुब्रमण्यम यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने 91 कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे यांच्या कंपनीला चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने 4 कोटी 45 लाख रुपये दिले होते. याशिवाय 20 कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं. याचबाबत ईडीकडून तपास सुरु होता. अखेर याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर ईडीने पांडे यांना अटक केली आहे.
संजय पांडे यांची सकाळपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर पांडे यांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुलीच्या संदर्भात सीबीआयने पांडे यांची चौकशी केली. तर एनएसई कंपनी घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीने त्यांची चौकशी केली. सोमवारी सीबीआयने प्रथम पांडे यांची चौकशी केली. फ़ोन टॅपिंग प्रकरणातही त्यांच्यावर आरोप आहे.
संजय पांडे यांनी 2001 मध्ये आयटी ऑडिट फर्म सुरू केली होती. त्यानंतर जेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही तेव्हा ते पुन्हा पोलीस सेवेत आले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला आणि आईला फर्ममध्ये संचालक केले. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सीबीआय आणि ईडीने त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली आहे.