भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, नाशकात चाललय तरी काय? चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून
नाशिक, प्रतिनिधी : सातपूर परिसरातील भाजप मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरल असून अवघ्या चार दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना घडली आहे. यामुळे आता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर परिसरातील भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे हे आज सकाळी कामगार युनियनच्या कामानिमित्त सातपूर एमआयडीसीमध्ये गेले होते. एका कंपनीमध्ये असलेले वाद मिटविण्यासाठी गेले असता तेथे अंतर्गत वाद झाले आणि त्या वादातून धारदार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करण्यात आले. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याबाबत पोलीस तपास करीत आहेत.