‘पैसे दे नही तो जानसे मार देंगे’ धमकी देत, सराफाला तलवारीचा धाक दाखवत ४ लाखांच्या सोन्याची चोरी
Monday To Monday NewsNetwork।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा| सराफाला तलवारीचा धाक दाखवीत जंगल झाडीत नेऊन खिशातील रकमेसह दुकानातील सोन्या, चांदीचे दागिने तिघांनी लुटल्याची घटना अंबड जवळील गरवारे पॉईंटजवळ घडली आहे.
पंचवटी मधील गणेशवाडी, संत सावता माळी अपार्टमेंट मध्ये रहिवासी असलेले संजय साधन बेरा (वय ४३) यांचे अंबडमधील मारुती संकुलाजवळ लोकनाथ ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते काल दुपारी 1 वाजता मुंबई नाका येथील श्रीराम फायनान्स येथे काम असल्याने दुकान बंद करून दुकानातील रक्कम व दागिने श्रीराम फायनान्समध्ये ठेवण्यासाठी जायचे असल्याने दुपारी दीड वाजता त्यांच्या मोटारसायकलीने निघाले. गरवारे पॉईंटमार्गे फाळके स्मारकाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडने ते हिरामोती कार मॉलपर्यंत असता त्यांच्या मागून आलेल्या दोन मोटारसायकलींवरील तिघांनी त्यांच्या मोटारसायकली आडव्या लावून गाडी रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यानंतर एमएच 15 सीक्यू 3745 या क्रमांकाच्या मोपेडवर बसलेल्या दोघांपैकी एक जण खाली उतरला. दोघांनी मास्क घातलेले व नंबर नसलेल्या पल्सरवरील तरुण त्यांच्या गाडीवर पाठीमागे बसला. पाठीमागे काही तरी शस्त्र लावून तो म्हणाला, की मै जिधर बोलूँगा, उधर गाडी जा के रोकनेका, नही तो इधरही काट डालूँगा । अचानक झालेल्या या प्रकाराने ते घाबरले. नंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे गाडी चालवीत अंजना लॉन्सच्या मागील बाजूस म्हाडा वसाहतीजवळ शुक्रतारा सोसायटीलगत मोटारसायकल थांबविण्यास सांगितले. त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोटारसायकल लावून त्यांनी सराफाला मोकळ्या जागेत व झाडीत नेले. त्या ठिकाणी दोन तलवारी व एक कोयता काढून एक तलवार त्याने स्वत:कडे ठेवली, तर दुसरी सराफाच्या पाठीमागे बसून आलेल्याच्या हातात दिली. त्यानंतर उलट्या तलवारीने सराफाच्या दोन्ही हातांवर, पायांवर व पाठीवर मारून एकाने डाव्या हाताच्या अंगठ्यावर वार करून दुखापत केली. त्यावेळी एकाने पँटच्या खिशातील दागिने, रोख रक्कम व मोबाईल काढून घेतला.
“तेरे पास और कुछ है क्या, होगा तो निकाल के दे,” असे सांगून शिवीगाळ करीत “हमे तुमसे बारह लाख रुपये चाहिए । नही तो तुम्हे जानसे मार देंगे,” असे दरडावले. चावीचा जुडगा काढून घेतला. त्यानंतर पुन्हा सराफाला त्यांच्या गाडीजवळ सोडून धमकी देत “पुलिस के पास गया, तो तुझे मार दूँगा,” अशी धमकी देत ते निघून गेले. या घटनेने प्रचंड घाबरलेले बेरा घरी निघून गेले. त्यानंतर सिमकार्ड दुसर्या मोबाईल फोनमध्ये टाकताच दुकानाच्या मालकांचा मुलगा प्रसाद चौधरी यांचा फोन आला. तो म्हणाला, की तुमने दुकानपे किसी को भेजा है क्या, उसने दुकान खोला था?” असे सांगताच संशय आल्याने हा प्रकार सराफांनी त्यांचे मित्र गोसावी यांना सांगितला. त्यांना घेऊन तक्रार देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यात ते गेले.
झालेल्या घटनेबाबत पोलिसांना माहिती देऊन दुकान दाखविण्यासाठी ते आले असता दुकानातील काऊंटरमधील दहा हजार रुपयांची रोख रक्कम, दहा हजार पाचशे रुपयांचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, 52 हजार 500 रुपयांची सोन्याची चेन, 19 हजार 500 रुपयांचे मंगळसूत्र, 13 हजार 500 रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स, 4 हजार रुपयांचा मोबाईल अशा खिशातील, तर दुकानातील 33 हजार रुपयांच्या नाकातील मुरण्या, 36 हजार रुपयांचे सोन्याचे ओमपान, 19 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या लहान मुलांच्या अंगठ्या, 27 हजारांचे कानातील कुडके, 70 हजारांचे कानातील टॉप्स, 18 हजार रुपयांचे मंगळसूत्रांचे सहा वाटीचे जोड, 48 हजारांचे सोन्याचे सुटे मणी असे एकूण 2 लाख 17 हजार 500 रुपयांचे दागिने दुकानातून व खिशातून 1 लाख 90 हजार असा एकूण 4 लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 394, 341, 34, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4, 26 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे अधिक तपास करीत आहेत.