भरदिवसा ७ लाखांच्या साेन्याच्या दागिन्यांची ज्वेलर्स शॉपमधून चोरी !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा : शहरातील सिडको परिसरातील शुभम पार्क येथील ज्वेलर्सच्या दुकानातून सात लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने लपांस केली. भरदिवसा ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, १०.३० च्या सुमारास आपल्या सद्गुरू अलंकार या दुकानाचे मालक प्रमोद विभांडिक हे सिडको परिसरातील शुभम पार्क, बंदावणेनगर येथे शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. त्यानंतर दुकान स्वच्छ करण्यासाठी ते दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यास गेले. त्यापूर्वी शेजारील किराणा दुकानदाराला त्यांनी लक्ष ठेवण्यास सांगितले. त्यानंतर किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. तिघांपैकी दोघे किराणा दुकानात तर एकजण ज्वेलरी शॉपमध्ये घुसला. विभांडिक यांनी ठेवलेली बॅग चोरी करत त्यांना सातपूरकडे जाण्याचा पत्ता त्यांनी विचारला. ही बाब दुकानमालकाच्या लक्षात आली व ते तातडीने दुकानाकडे आले असता बॅग लंपास झाल्याचे त्यांना समजले. या बॅगमध्ये तब्बल १५० ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल होता.
घटनेची माहिती अंबड पोलिसांना देण्यात आली. पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आपली बॅग पत्ता विचारणाऱ्या इसमानेच गायब केली असल्याचे समजले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.