Video| लॉन्समध्ये अवैधरित्या देशी दारू कारखान्यावर छापा : १ करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त
मंडे टू मंडे वृत्तसेवा :
नाशिक, प्रतिनिधी : जिथे विवाहबंधनाच्या गाठी बांधायच्या, जिथे मंगलाष्टकांचे प्रेरणादाई सुर कानावर यायला हवेत, जिथे लाडक्या लेकीची पाठवणी करतांना माता पित्यांच्या अश्रूंमधून ओघळणार्या पवित्र भावनांनी ब्रम्हांड मंत्रमुग्ध व्हावे अशा लॉन्समध्ये पिढ्या उद्ध्वस्त करण्याचा उद्योग सुरू असेल यावर कोण विश्वास ठेवणार? मात्र जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने काल रात्री ११ वाजता टाकलेल्या छाप्यात लॉन्समध्ये सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा बेकायदेशीर कारखाना उद्ध्वस्त केला असून जप्त केलेल्या मुद्देमालाच्या १ कोटीच्या घरात असल्याने खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदोरी शिवारात असलेल्या उदयराजे लॉन्समध्ये बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्री या लॉन्सवर छापा टाकला. या ठिकाणी दारू निर्मितीसाठी असलेले एकूण नियोजन पाहिल्यानंतर एखाद्या अधिकृत कारखान्यातही नसेल अशी सारी व्यवस्था या बेकायदेशीर कारखान्यात पहायला मिळाली. या छाप्यात मोठा मुद्देमाल हाती लागला आहे.
ग्रामीण पोलीस पथकाने लॉन्सवर दिनांक ११ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी संजय मल्हारी दाते, वय – ४७ वर्षे, रा-गोंदेगाव ता.निफाड जि. नाशिक हा मिळुन आला असुन त्याचे कब्जात बनावट देशी दारूचे अंदाजे १५०० ते २००० बॉक्स, अंदाजे १०,००० ते १५,००० देशी दारू रिकाम्या बाटल्या, स्पिरीट अंदाजे २० हजार लिटर २०० लिटरचे ९० ते १०० बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे ५००० ते १०,०००, देशी दारू बनविण्याचे साहित्य, पाण्याच्या टाका ०५ व ०१ ट्रक असा एकुण अंदाजे ०१ करोड रूपयांचा ऐवज घटनास्थळावरून या पथकाने जप्त केला. सदर देशी दारू कारखाना अंबादास विठोबा खरात याच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरु होता. या कारवाईत १२ संशयितांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाच्या प्राथमिक तपशीलावरून ही सर्वात मोठी कारवाई असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.