अबब…जामिनास मदतीसाठी ५ लाखांची मागणी : लाच घेताना API एसीबीच्या जाळ्यात
Monday To Monday NewsNetwork।
पुणे, प्रतिनिधी : फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत त्यातील एक लाख रुपयांची लाच घेताना पुण्यात सहायक पोलीस निरीक्षकासह दोघे जण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. जामीनासाठी मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी पोलीस अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी एक लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल अशोक पाटील (वय 33 वर्ष) आणि खासगी व्यक्ती संतोष भाऊराव खांदवे (वय 45 वर्ष, रा. लोहगाव) अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावं आहेत. तक्रारदाराच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराने वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जामिनास विरोध न करणे तसेच अनुकुल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती. याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती.
पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी लोहगाव परिसरात पाठविले. दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. फसवणुकीच्या गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यास मदत करण्याचं आश्वासन देत त्यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. पाच लाखांपैकी एक लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना दोघे रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीच्या जाळ्यात सापडले.