दोन तरुणांची गळफास लावून आत्महत्येचा दोन घटना
नाशिक, प्रतिनिधी : शहरात काल दोन वेगवेगळ्या ठिकाणी पहिली घटना पाथर्डी फाटा येथे तर आत्महत्येची दुसरी घटना गांधीनगर नाशिकरोड येथे तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असून दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
शहरातील आत्महत्येची पहिली घटना पाथर्डी फाटा येथे घडली असून समाधान सुभाष माळी (वय 35, रा. शिवधारा रो-हाऊस, दत्त मंदिरासमोर, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा) याने राहत्या घराच्या हॉलमध्ये असलेल्या छताच्या लोखंडी हुकाला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब लक्षात आल्यानंतर मनीष मोतीलाल महाजन (रा. द्वारका, नाशिक) यांनी इंदिरानगर पोलिसांना कळविले. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार चकोर करीत आहेत.
तर दुसरी आत्महत्येची घटना गांधीनगर येथे घडली दिगंबर कचरू थोरात (वय 40, रा. राहुलनगर, टाकळी रोड, गांधीनगर, नाशिकरोड) याने राहत्या घराच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्यास त्याचा भाऊ उत्तम थोरात याने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ. काळे यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार माळोदे करीत आहेत.