भयंकर; फोटोसेशनच्या बहाण्याने दारु पाजून महाविद्यालयीन युवतीशी अश्लील चाळे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सातारा वृत्तसंस्था : तालुक्यातील केळवली गावच्या हद्दीत युवतीस मद्य पाजून तिच्याशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यानुसार पोलिसांनी एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले असून, त्याचे इतर साथीदार पसार झाले आहेत.
सातारा परिसरातील एक युवती मित्रांसमवेत केळवली परिसरात फिरण्यासाठी गेली होती. याठिकाणी तिच्यासोबत असणाऱ्या काही युवकांनी त्या युवतीस मद्य पाजले. मद्य पाजल्यानंतर त्या युवतीसोबत फोटोसेशन करण्याचा बहाणा करत काही युवकांनी अश्लील चाळे केले. यास विरोध केल्याने त्या युवतीस सोबतच्या युवकांनी कारमध्ये बसवत मारहाण केली.
घरी आल्यानंतर युवतीने घडला प्रकार वडिलांना सांगितला. यानंतर त्यांनी याची तक्रार काल सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंदवली. यानुसार आज त्या पीडित युवतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे या प्रकरणातील गांभीर्य वाढले असून, त्याबाबत स्वतंत्र गुन्हा नोंदविण्याच्या प्रक्रियेवर रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा खल सुरू होता.