भयंकर; पुतण्याने घरात घुसून केला काकाचा खून !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन, नागपूर ।
नागपूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून घरात घुसून पुतण्याने काकाला काठीने बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून नागपूर शहरांमध्ये हत्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पंचशील नगरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका पुतण्याने स्वतःच्या काकांनाच घरात घुसून काठीच्या सहाय्याने त्यांची हत्या केली. अशोक मेश्राम असं मृत काकाचे नाव आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पुतण्याला अटक केली आहे. 9 वर्षांपूर्वी मृतक अशोक मेश्राम आणि आरोपी सारंग युवराज मेश्राम (वय 33) च्या वडिलांमध्ये भांडण झाले होते. तसेच 1 दिवसांपूर्वी ही आरोपी आणि मृतक यांच्यामध्ये भांडण झाले होते या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने आपल्याच काकाची हत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मेश्राम याला प्रचंड दारूचे व्यसन होते. तो एका चिकनच्या दुकानात कामाला होता. दारुच्या व्यसनामुळे दोन वर्षांपूर्वीच त्याची पत्नी सोडून गेली होती. त्याच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्यावरून पुतण्या सारंगसोबत त्याचे भांडण झाले होते. जुना वाद उकरून काढत त्याने पुतण्याला शिवीगाळ केली होती. त्यामुळे झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी पुतण्या खुन्नस मनात ठेवून होता. रात्री काका मेश्राम दारू पिऊन घरी झोपला होता. तेव्हा लाकडी दांडके घेऊन सारंग घरात गेला आणि डोक्यात सपासप प्रहार करून काकाचा जीव घेतला.