संतापजनक! नराधमांचा १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; जीभ कापून, डोळे फोडले !
मुंबई (वृत्तसंस्था)। देश कोरोनाशी दोन हात करत असतांना या काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी जिल्ह्यात ईशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भयंकर प्रकार घडला. अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी पोलिसांना उसाच्या शेतात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तो पोस्टमार्टेमसाठी पाठवला आणि रिपोर्ट पाहून पाया खालची जमीनच सरकली.
अल्पवयीन मुलगी शेतात शौचालयासाठी गेली होती. तिथून जाणाऱ्या गावातील दोन मुलांनी या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बलात्कारानंतर या तरुणांनी तिचे हाल केल्याचं दिसत होतं. जीभ कापली होती आणि डोळे फोडले होते. गळ्यातील ओढणीनं तिला खेचल्याचे व्रणही मृतदेहावर उमटल्याचं दिसत होतं. उसाच्या शेतात हा मृतदेह फेकून दोघंही तरुण फरार झाले. मुलगी खूपवेळ घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली त्यानंतर पोलिसात मुलगी घरी आली नसल्याची माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात सामूहिक बलात्कार आणि गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉस्को आणि हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केली आहे.