फोन पे वरून पैसे घेणाऱ्या मुक्ताईनगरच्या पोलीस उपनिरीक्षकांसह चार पोलीस कर्मचारी निलंबित
मुक्ताईनगर/जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी l जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिस स्टेशन संदर्भात खळबळ उडवून देणारी एक मोठी माहिती समोर आली आहे. गुटख्याची अवैध तस्करी करीत असताना वाहतूक करणारे गुटख्याचे वाहन ९६ हजार रुपये फोन पे वरून घेऊन सोडून दिल्याने मुक्ताईनगर येथील पोलीस उपनिरीक्षक व चार पोलीस हेडकॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल, याना पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश काढल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत आरोग्यास अपायकारक असलेल्या राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा अवैध तस्करी करणारे एम एच ०२ बी एम ८४२५ हे वाहन जप्त करण्यात आले होते. त्या वाहनातून सुमारे ४ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या वाहनावर मुक्ताईनगर पोलिसांनी कारवाई केली होती. व गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
परंतु त्या गुटख्याचे वाहन ९६ हजार रुपये फोन पे वरून घेऊन सोडून देण्यात आले होते. आणि तेच वाहन मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पकडले होते.या बाबत आमदारांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रारही केली होती. आमदारांच्या तक्रारीवरून पोलिस अधीक्षकांनी चौकशीचे आदेशही दिले होते.त्या चौकशीच्या कसुरी अहवालावरून पोलिस उप निरीक्षक राहुल बोरकर व त्यांच्या पथकातील हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी, निखिल नारखेडे, नाईक सुरेश पाटील या पाचही जणांना जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी संध्याकाळी निलंबित केल्याचे आदेश काढले.. यांच्या या कारवाईने जळगाव जिल्ह्यात पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून धास्ती निर्माण झाली आहे.