“मुक्ताई भवानी अभयारण्यात” नर बिबट्याचा मृत्यू
मुक्ताईनगर तालुक्यातील घटना
सुकळी, ता. मुक्ताईनगर. मंडे टु मंडे न्युज. ज्ञानेश्वर सावळे | जळगाव जिल्ह्यातील पट्टेदार वाघांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या ‘मुक्ताई-भवानी अभयारण्या’ तील डोलारखेडा वनपरीमंडळातील उत्तर डोलारखेडा कं.नं.५७३ मध्ये एका बिबट्याचा दुर्देवाने मृत्यु झाल्याची घटना काल दि.20 रोजी रात्री दहाच्या सुमारास गस्ती दरम्यान उघडकिस आली. सुमारे साडेतीन-चार वयोवर्ष असलेला नर जातीचा हा बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळुन आला. गस्तीदरम्यान दुर्गंधी येत असल्याने वनमजुरांनी शोध घेतला.
प्राथमिक अंदाजानुसार बिबट्याचा मृत्यु नैसर्गिकरीत्या झाला असल्याचा अंदाज असला तरी शवविच्छेदन अहवालानंतर खरे कारण कळु शकेल. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास मृत बिबट्याला डोलारखेडा येथे आणण्यात आले. वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.यश सागर, मुक्ताईनगर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी रामदास जाधव, डॉ.स्वागती करमांगे , डॉ.चव्हाण यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले.
उपवनसरंक्षक प्रविण ए यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपवनसरंक्षक उमेश बिराजदार, वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांच्यासह उपस्थित डोलारखेडा वनपाल तथा प्रख्यात शुटर गणेश गवळी, वनरक्षक जी.बी.गोसावी, वनरक्षक रणजित यांनी मयत बिबट्यावर सोपस्कार पार पाडले. दरम्यान मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई, वनसमीती अध्यक्ष विनोद थाटे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.
काही दिवसांपासून बिबट्या आजारी असल्याचा ग्रामस्थांचा संशय
दरम्यान, डोलारखेडा येथील शिवाजी वानखेडे, अमोल सुरवाडे, विनोद थाटे या ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी रस्ता ओलांडताना बघितले असता तेव्हा तो बिबट्या संथ चालीसह आजारी असावा असा अंदाज वनकर्मचाऱ्यांना कळवला होता मात्र वनविभागाने लक्ष दिले नसल्याचे प्रतिनीधीशी बोलतांना सांगतिले. मात्र वनविभागाकडुन या आरोपाचे खंडन करतांना तो बिबट्या आजारी नव्हताच. जंगलात ठिकठिकाणी ट्रप कॅमेरे लावलेले असुन मृत बिबट्या हा कमजोर नव्हताच. याशिवाय या बिबट्याची छबी काही दिवसांपूर्वी कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. यामुळे त्या आरोपांत तथ्थ नसल्याचे वनविभागाकडुन समजते.
मृत बिबट्याचा व्हिसेरा प्रयोग शाळेत पाठवला जाणार असुन अहवालानंतर मृत्युचे खरे कारण समजणार आहे.
“शवविच्छेदना दरम्यान बिबट्याने शिकार केली असल्याचे अवशेष आढळुन आल्याने तो कमजोर तथा भुकबळीने मृत्यु झाला नसावा. नैसर्गिकरीत्या मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, असे वनपरीक्षेत्र अधिकारी परीमल साळुंखे यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा