ऑक्सिजन अभावी रुग्णालयातील 20 रुग्णांचा मृत्यू; परिस्थिती विदारक !
Monday To Monday NewsNetwork।
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): देशातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती अत्यंत भयानक झाली असताना ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचे पाहायला मिळत असून दिल्लीच्या हॉस्पिटल्समध्ये ही ऑक्सिजनचा तुटवडा आहे. अशातच दिल्लीतून आलेल्या एका बातमीमुळे मन हेलावून जाईल, अशी परिस्थिती आहे. दिल्लीच्या जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 लोकांचा मृत्यू झालाची दुर्दैवी घटना घडली आहे.
जयपूर गोल्डन हॉस्पिटलचे डॉ. डीके बालूजा यांनी म्हटलं की आमच्याकडे फक्त अर्धा तास पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. इथे 200 हून अधिक रुग्णांचं आयुष्य धोक्यात आहे. आम्ही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 20 लोकांना आधीच गमावून बसलो आहे. दिल्लीत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला असून दिल्लीमध्ये बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात एक आणिबाणीचा प्रसंग निर्माण होऊन ऑक्सिजनच्या पुरवठ्यात तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे 500 रुग्णांचा जीव धोक्यात आला होता; पण या ठिकाणी वेळेत ऑक्सिजनचा टँकर पोहोचला आणि या सर्व रुग्णाचा जीव वाचला. ही घटना ताजी असतानाच आज दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिल्लीच्या आणखी दोन हॉस्पिटल्सनी मेडीकल ऑक्सिजनच्या तातडीच्या पुरवठ्यासाठी शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. अशा सर्व हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्सना कोर्टाने म्हटलंय की, जर रुग्णांच्या उपचारासाठी त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर त्यांनी सर्वांत आधी दिल्ली सरकारच्या नोडल ऑफिसरशी संपर्क साधावा. यादरम्यानच केंद्राने दावा केलाय की, या प्रकारच्या समस्यांसाठी एक सेंट्रल व्हर्च्यूअल रुम बनवली गेली आहे, जी लवकरच सक्रिय होईल.