आवाजावरून ३० सेकंदांत कोरोना चाचणी शक्य ? अभ्यास सुरू !
नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भल्याभल्या देशांनी कोरोनासमोर हात टेकले असताना केवळ ३० कोरोना चाचणी शक्य आहे का? रुग्णाच्या केवळ आवाजावरून आणि श्वासोच्छवासाच्या वेगाद्वारे कोरोना संक्रमण आहे किंवा नाही हे ओळखता येणं शक्य आहे का? यावरच दिल्लीत वैज्ञानिकांचा एक गट अभ्यास करतोय. इस्रायली वैज्ञानिकांची एक टीम एलएनजेपी रुग्णालयात याच्या वेगवेगळ्या प्रयोगांत गर्क आहे. त्यांनी लोकांना या ट्रायलमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दिल्लीमध्ये ही ट्रायल एलएनजेपी रुग्णालयाशिवाय राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सुरू आहे. जवळपास १० हजार लोकांवर अशा पद्धतीनं करोना चाचणीचा प्रयोग केला जाणार आहे. हा प्रयोग जर यशस्वी ठरला तर केवळ ३० सेकंदांमध्ये रुग्ण करोना संक्रमित आहे किंवा नाही याचा तपास लागू शकेल.
केवळ ३० सेकंदात करोना चाचणी शक्य झाली तर त्याचा भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला मोठा फायदा होऊ शकेल. एलएनजेपी रुग्णालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसा, या ट्रायलमध्ये चार पद्धतींचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, सर्वात महत्त्वाची व्हॉईस टेस्ट आणि ब्रिदीग टेस्ट आहे. याशिवाय आणखी दोन प्रकारच्या टेस्टचाही यात समावेश आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, १० हजार जणांवर एकदा नाही तर दोनदा ही चाचणी करण्यात येणार आहे, त्यानंतर त्याच्या निष्कर्षापर्यंत पोहचणं शक्य होणार आहे. जेव्हापर्यंत लस विकसीत होत नाही तोपर्यंत कोरोनासोबत जगण्यासाठी अशा पद्धतीच्या चाचणीचा लोकांना मोठा फायदा होऊ शकेल. येत्या काही दिवसांत या चाचणीचा परिणाम हाती येऊ शकेल.
इस्रायल दूतावास आणि डीआरडीओच्या संयुक्त प्रयत्नांनी हा अभ्यास केला जातोय. लवकरात लवकरच कोरोना पोसिटीव्ही रुग्णांना आयसोलेट करण्यासाठी ही पद्धत अतिशय उपयोगी ठरू शकेल. इतकंच नाही तर रुग्णांची ओळख वेळीच झाल्यानं त्यांना लवकरात लवकर उपचार मिळू शकतील, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या अभ्यासात सहभागी होण्यासाठी अनेक आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशिवाय फायर सर्व्हिसशी निगडीत लोक चाचणीसाठी स्वेच्छेने दाखल होत असल्याचंही एलएनजेपीच्या डॉक्टरांनी म्हटलंय.