द्वारका नगर चौफुलीवर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ. दीपक लोखंडे | येथील द्वारका नगर परिसरातील महाकालेश्वर मंदिर चौफुलीवर वर्दळ वाढत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या चौफुलीच्या चारही दिशांना तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी स्वयंशोध फाउंडेशन, नशिराबादच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात नशिराबाद नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पंकज महाजन यांना निवेदन देण्यात आले. द्वारका नगर येथील महाकालेश्वर मंदिर हे गावातील प्रमुख चौफुलीवर स्थित असून या चौफुलीमधून गावातील मुख्य रस्ते जोडले जातात. त्यामुळे येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
मंदिरात भाविकांची सतत ये-जा सुरू असते. तसेच मंदिराच्या मागील बाजूस शाळा असून चौफुलीच्या लगतच शाळेचे पटांगण आहे. परिणामी शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच भाविकांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
यापूर्वीही या चौफुलीवर किरकोळ अपघात घडले असून सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौफुलीच्या चारही दिशांना तातडीने स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना स्वयंशोध फाउंडेशनच्या वतीने योगेश कोलते, धिरज सैतवाल, नरेंद्र धर्माधिकारी, भूषण कोल्हे, घनश्याम माळी, चेतन सपकाळे, अक्षय महाजन आदी उपस्थित होते.


