तब्बल ३५१५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, निवडणुक आयोग मालामाल, सर्वाधिक उमेदवार कोणाचे?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकत्याच महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ४१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, त्यातील ३५१५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. एकूण उमेदवारांच्या ८५ टक्के इतकी उमेदवारांची ही संख्या होते.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांपैकी सरासरी १/६ हजार मते घेणाऱ्या पराभूत उमेदवारांना त्यांची अनामत रक्कम परत दिली जाते. हा टप्पा पार न करणाऱ्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होते. मागील १० वर्षातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. जमा झालेल्या डिपॉझिटमुळे निवडणूक आयोगाकडे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. त्या मुळे निवडणूक आयोग मालामाल झाला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराला १० हजार रुपये डिपॉझिट भरावे लागते, तर मागासवर्गीय आणि आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना ५००० रुपये डिपॉझिट भरावी लागते.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत सरळ लढत होती. मविआच्या २२ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. यामध्ये काँग्रेसच्या ९ शिवसेना ठाकरे गटाच्या ८ आणि शरद पवार गटाच्या ३ उमेदवारांचा समावेश आहे. मविआतील शेतकरी कामगार पक्षाच्या २ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आले नाही. या पक्षांच्या उमेदवारांना
अतिशय कमी मतदान मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.
विशेष म्हणजे भाजपच्या सगळ्याच उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवण्यात यश आले. मात्र शिंदे गटाच्या १ आणि अजित पवार गटाच्या ३ उमेदवारांना अमानत रक्कम वाचवता आली नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा