लस नोंदणीचे Co-Win सर्व्हर पहिल्याच दिवशी काही मिनीटांतच क्रॅश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली असून, सरकारने लसीकरणावर भर दिला आहे. आता यामुळे 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोना लस देण्यात येणार आहे. यासाठी 18 वर्षांवरील व्यक्तींना नोंदणी करण्याची सुविधा आजपासून सुरू करण्यात आली आहे. परंतु, या यंत्रणेवर प्रचंड ताण आल्याने आज पहिल्याच दिवशी ती क्रॅश झाली लसीकरणासाठीचं रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालं. परंतु कोविन अॅपवर (CoWIN) रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या काही मिनिटांतच कोविन अॅपचा सर्व्हर क्रॅश झाला. कोविन अॅप सर्व्हर डाउन झाल्याची माहिती अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर केली आहे.
18 वर्षांवरील व्यक्ती 1 मेपासून कोरोना लस घेण्यास पात्र आहेत. ते सरकारचा को-विन प्लॅटफॉर्म आणि आरोग्य सेतू अॅपवर आज सायंकाळी 4 वाजल्यापासून नाव नोंदवू शकत होते. परंतु, नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू होताच को-विन प्लॅटफॉर्म आणि आरोग्य सेतू अॅप क्रॅश झाले. यामुळे लोकांनी लसीकरणासाठी नावच नोंदवता आले नाही. अनेक नेटिझन्स सोशल मीडियावर ही बाब मांडली. सरकार फसवणूक करीत असल्याचा सूरही काही नेटिझन्सनी व्यक्त केला. सध्या देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येत आहे. मात्र, खासगी रुग्णालयात यासाठी 250 रुपये मोजावे लागत होते. सरकारने आता ही किंमत कमी करुन 200 रुपयांवर आणली आहे.
जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील रुग्णांनाही लस दिली गेली.