Breaking: गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय़ सोमवारी – शरद पवार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली : वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक खुलासा परम बीर सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोणतिही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. आज, शरद पवार यांनी दिल्लीतील निवासस्थांनी पत्रकारांशी संवाद साधून, पहिल्यांदाच याविषयावर भाष्य केले.
मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी आपले पद गेल्यावरच आरोप का केले ? असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज रविवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांना पदावर असताना या प्रकरणावर का बोलावस वाटल नाही. मुंबई पोलिस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यानंतरच त्यांना हे आरोप करावेसे का वाटले ? असा सवालही पवारांनी केला. वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना पोलिस सेवेत परमबीर सिंह यांनीच आणले, त्यामध्ये मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा कोणताही सहभाग नव्हता असे सांगत त्यांनी या प्रकरणात सरकारलाही क्लिन चिट दिली. राज्य सरकारला या प्रकरणात कोणताही धोका नसल्याचे सांगत त्यांनी या प्रकरणात परमबीर सिंह यांची चौकशी करण्याचा पर्याय सुचवला आहे. गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या विषयावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राहिलेल्या जुलिओ रिबेरो यांच्या अध्यक्षतेत चौकशी करण्याचा पर्याय पवार यांनी सुचवला आहे. त्यामध्ये अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा पर्यायही विचारात असल्याचे त्यांनी सांगितले.
परमबीर सिंह यांच्या पत्रात १०० कोटी रूपये कोणाला दिले याचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे आपले पद गेल्यावरच झालेले आरोप केल्याचे शरद पवारांनी सांगितले. परमबीर सिंह यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पण या आरोपामध्ये केलेल्या पत्रावर स्वाक्षरी नसल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. या संपुर्ण प्रकरणाला मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच माझे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले असल्याचेही पवार म्हणाले. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर सोमवारी निर्णय़ होईल. पण हा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या संपुर्ण प्रकरणात गंभीर दखल घेतानाच आम्ही अनिल देशमुख यांच्या बाबतीत काही पर्याय ठेवले आहेत. त्यापैकी एक पर्याय म्हणजे त्यांचा राजीनामाही घेतला जाऊ शकतो असेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या गृहमंत्री पदाबाबत सोमवारी निर्णय़ हा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाऊ शकतो असेही संकेत पवारांनी यावेळी दिले. आम्ही पक्षात याबाबतची चर्चा करत आहोत. तसेच घटक पक्षांसोबत बोलणार असल्याचेही ते म्हणाले. या संपुर्ण प्रकरणात चौकशीची गरजेचे असून म्हणूनच मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना म्हणजे जूलिओ रिबेरो यांना या चौकशीसाठी नेमण्याचा पर्याय सुचवल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.