देशांच्या राजकारणात पंतप्रधान मोदींच्या नावे नवा विक्रम !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मागे टाकत सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आपला संपूर्ण कार्यकाळ मिळून 2,268 दिवस देशाचे पंतप्रधान होते. ते आतापर्यंत सर्वाधिक काळ देशाच्या पंतप्रधान पदावर राहणारे एकमेव बिगर-काँग्रेसी पंतप्रधान होते. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबतीत गुरुवारी त्यांना मागे टाकले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाला. त्यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला आणखी मोठा विजय मिळाला आणि नरेंद्र मोदी दुसर्यांदा पंतप्रधान झाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले. पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते. तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या खालोखाल माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी विराजमान होते. त्यांनी १० वर्षे ४ दिवस देशाचे पंतप्रधानपद भूषवले.